पंचगंगेच्या पाणी पातळीत दीड फुटांनी वाढ 

इचलकरंजी, धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिड फुटांनी वाढ झाल्याने पाणी पातळी (Water level) सायंकाळी ५९.६ फुटावर पोहचली आहे. पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. गुरूवारी आयुक्त पल्लवी पाटील, उपायुक्त नंदू परळकर यांनी यांत्रिक बोटीतून जॅकेवल आणि कट्टमोळा परिसरात पाहणी करून आपत्कालीन यंत्रणेस दक्षतेबाबत सुचना दिल्या. दरम्यान रेणुका मंदिर परिसरात पुराच्या साचलेल्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटल, व कचरा साठल्याने दुर्गंधी सुटत आहे. सदरचा कचरा तात्काळ काढून टाकावा अशी मागणी होत आहे.

 येथील पंचगंगा नदीवरील लहान पुलाला लागुन पाणी वाहत असल्याने बुधवारी महापालिका प्रशासनाने बरैकेटस लावून हा पुल वाहतुकीसाठी बंद केला होता. नदी काठावर आपत्कालीन मदतकार्यासाठी यांत्रिक बोटीसह अग्निशमन दलाचे पथकही २४ तास तैनात करण्यात आले आहे. २४ तासात पाणी पातळी दिड फुटांनी वाढल्याने गुरूवारी सायंकाळी ५९.६ फुटावर पोहचली आहे. नदीकाठावरील श्री रेणुका मंदिर, स्मशानभूमीपर्यंत पाणी पोहचले आहे. पाणी पात्राबाहेर पडले असून पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिल्यास शुक्रवारी लहान पुलावर पाणी येऊ शकते.. पाणी पातळीत सतत वाढ होत असल्याने गुरूवारी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, उपायुक्त नंदू परळकर यांनी यांत्रिक बोटीतून जॅकेवल आणि कट्टीमोळा परिसरात पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी आपत्कालीन यंत्रणेस दक्षतेबाबत योग्य त्या सुचना दिल्या.