गोमेवाडी (Gomewadi) (ता. आटपाडी) येथील सदाशिव नारायण दबडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ८ लाख ४० हजार ५०० रुपयांच्या मुद्देमाल चोरून नेला. ७ ते १८ जुलैदरम्यान ही चोरी झाली. याप्रकरणी आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, सदाशिव दबडे हे मुळचे गोमेवाडी येथील असून सध्या इचलकरंजी (ता. हातकणंगले , जि. कोल्हापूर ) येथे वास्तव्यास आहेत. ७ जुलैपासून ते आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. १८ जुलैरोजी घरी परतल्यावर त्यांना घरातील खिडकीचे लोखंडी गज तोडलेले व घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले. त्यांनी घरात पाहणी केली असता, २ लाख रुपये किमतीची ४ किलो २२५ ग्रॅम चांदीची वीट , दोन लाखाचा ५० ग्रॅम सोन्याचा चौकोनी तुकडा , दोन, लाख रुपये किमतीचे ६० ग्रॅम वजनाचे नाकातील खडे , कानातील टॉप्स , तसेच १०० कॅरेट डायमंड , पुष्कराज मोती , नीलम , २२५ ग्रॅम चांदीचा हार , १०० ग्रॅम चांदीचा हार , २५ ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे , रोख रक्कम आणि सुमारे ५ हजार रुपये किमतीच्या १०० सड्या रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असल्याचे दिसून आले. या प्रकरणामुळे गोमेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास सहायक निरीक्षक राजीव केंद्रे करत आहेत.
