बेकायदेशीर आणि समाजाला त्रास होईल, अशा पद्धतीने डीजे अथवा बॅन्जो सुरु असलेला आढळल्यास , थेट कारवाई करण्यात येईल. कार्यक्षेत्रात बेकायदेशीर डीजे चालू देणार नाही असा इशारा विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिला. खानापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून डीजेचा दणदणाट आणि बॅन्जोचा कर्कश आवाजाबद्दल तक्रारी वाढू लागल्या आहेत. मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजेमुक्त आणि पारंपरिक पद्धतीने उत्साहात सण साजरे करण्याचे आवाहन केले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही डिजेमुक्त सांगली जिल्हा संकल्प राबविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी तालुक्यातील डीजे आणि बॅन्जो चालकांची बैठक घेतली . यावेळी पोलीस निरीक्षक फडतरे म्हणाले ,डीजे आणि बॅन्जो व्यावसायिकांना आवाज आणि वेळेची मर्यादा पाळणे गरजेचे आहे. आपल्याकडे सण , समारंभ सोडूनही इतर कार्यक्रमात डीजेच्या वापराची पद्धत जास्त आहे. त्याचा त्रास समाजाला होत आहे. आवाजाने वृद्ध अथवा आजारी लोकांना त्रास होतो. एकदा कार्यक्रम सुरु झाला कि संयोजक आणि डीजे मालक या दोघांच्याही हातात त्याचे नियंत्रण राहत नाही . परिणामी कर्णकर्कश आवाजाने लोक हैराण होतात. आपल्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर डीजे आणि बॅन्जो चालू देणार नाही. वेळेची मर्यादा ओलांडल्यावर डीजेचा मिक्सर जप्त करून गुन्हे दाखल केले जातील. डीजेमालकांनी परवानगी असल्याशिवाय डीजे लावू नये . अन्यथा कारवाई करावी लागेल. तुमचा व्यवसाय कायदेशीर पद्धतीने करा. पारंपरिक वाद्य म्हणून बॅन्जो वाजवत असाल तर ठीक, मात्र बॅन्जोच्या नावाखाली डीजेचे बेस लावून लोकांना हैराण कराल तर खपवून घेणार नाही ,असा इशाराही फडतरे यांनी यावेळी दिला.
