विट्यातील खासगी ट्रॅव्हल्सचा कर्नाटकात भीषण अपघात

  विटा(vita) शहरातून सेलमला निघालेल्या  एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा कर्नाटकातील मोटेबेन्नूर (जि. हावेरी) येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दोनजण ठार झाले आहेत. अर्णवी सचिन महाडिक (वय ११, रा. नेवरी, ता. कडेगाव) आणि यश खाशाबा सावंत (वय २०, रा. बस्तवडे, ता. तासगाव) अशी मृतांची नावे आहेत.

 याबाबत अधिक माहिती अशी, विटा येथील वेंकटेश्वरा या खासगी कंपनीची प्रवासी बस कर्नाटकातील सेलमला निघाली होती. मंगळवार मध्यरात्री सदरची बस हावेरी जिल्ह्यातील ब्याडगी तालुक्यातील मोटेबेन्नूरजवळ राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून जात असताना समोरून भरधाव वेगाने एक कार आली.या कारला चुकवून अपघात टाळण्यासाठी बस चालकाने ब्रेक लावला. मात्र, गाडी थेट दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली. यात अर्णवी संजय महाडिक आणि यश सावंत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील अन्य ६ जण गंभीर जखमी झाले. या बस मध्ये एकूण ३१ प्रवासी असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची ब्याडगी पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली असून हावेरी जिल्ह्याच्या पोलीस | अधीक्षिका यशोदा वंतगोडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. तसेच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अपघात स्थळी तत्काळ मदत कार्य सुरू केले. जखमींवर हावेरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात मयत झालेली अर्णवी आणि यश हे दोघेही सांगली जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.