पट्टणकोडोली,डॉ. कृष्णाजी मसुरकर युवाशक्ती आणि अलाटवाडी येथील स्वर्गीय पुष्पादेवी हरिभाऊ मसुरकर सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे आयोजित १ लाख ११ हजार १११ रुपयांची दहीहंडी तासगाव (जि. सांगली) येथील शिवनेरी गोविंदा पथकाने सात थर रचत फोडली.
प्रारंभी फाऊंडेशनचे संस्थापक व माजी उपसरपंच डॉ.कृष्णाजी मसुरकर यांनी स्वागत केले. पट्टणकोडोली ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच नम्रता माळी, हॉटेल सातबाराचे सर्वेसर्वा राहुल सावंत, सोशल मीडिया स्टार विपुल चिंचणे, रिलस्टार प्रज्योत कमते (पज्या) व मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन व हंडीचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी कागल येथील शांतीदूत मर्दानी आखाडा यांनी ऐतिहासिक मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली.
या दहीहंडीसाठी माजी आमदार राजूबाबा आवळे, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शाहू काटकर यांच्यासह सिने अभिनेत्री स्वाती लिमये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत साकारलेला तरुण रोहित धामणे हे विशेष आकर्षण ठरले होते. ग्रामीण भागातील सर्वात मोठी दहीहंडी हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत झाली असून यावेळी भर पावसातही नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
पहिल्यांदा सलामी नंतर ४८ फुटावर बांधलेल्या या हंडीपर्यंत पोहोचण्याचा सर्व मंडळांनी आटोकाट प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये अपयश आल्यानंतर हंडीची उंची ४२ फुटावर आणण्यात आली. दरम्यान, आयोजकांकडून पारदर्शकता राखत गोविंदा पथक अध्यक्षांच्या समोर लकी ड्रॉ काढण्यात आला.
पहिल्या फेरीत सहा फूट दहीहंडी खाली घेण्यात आली. यामध्ये शिवनेरी गोविंदा पथकाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सात थर रचत अखेर मानाची दहीहंडी फोडली. त्यानंतर डीजेच्या तालावर गोविंदांनी
एकच जल्लोष केला. सात थर लावलेली परिसरातील ही पहिलीच दहीहंडी ठरली. उच्च दर्जाची सुरक्षा, प्रकाशयोजना, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे हा सोहळा अधिकच रंगतदार झाला. विजेत्या गोविंदा पथकांना प्रभारी सरपंच नम्रता माळी, फाऊंडेशनच्या अध्यक्षा यशश्री मसुरकर व माजी उपसरपंच डॉ. कृष्णाजी मसुरकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी विविध क्षेत्रात निवड झालेल्या व प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. यावेळी हातकणंगलेचे माजी सरपंच संदीप कारंडे, मिरज भाजपाचे संयोजक मितेश पवार, संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष झाकीर भालदार, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. देवयानी पाटील, डॉ. विद्या हुपरे, इंगळीचे सरपंच दादासो मोरे, उपसरपंच अनिल भोसले, धुळगोंडा डावरे, राणोजी पुजारी, रविंद्र आडके, लक्ष्मण पुजारी, राजेंद्र रोंगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, युवक मंडळांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे उपस्थित होते. सदस्य व शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणताही अनुचित प्रकार घडू चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात म्हणून हुपरी पोलीस ठाण्यातर्फे आला होता. हा दहीहंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉ. कृष्णाजी मसुरकर युवाशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. हर्ष गुडाळे व तेजस्विनी पांचाळ यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.
