म्हाडाच्या (MHADA) 5 हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. आता या लॉटरीला पुन्हा दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 9 ऑक्टोबर रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गंत उभारण्यात आलेल्या 5 हजार 285 सदनिका व ओरोस (सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीच्या लॉटरीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला 12 सप्टेंबरपर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
अनामत रकमेसह प्राप्त पात्र अर्जाची सोडत आता 9 ऑक्टोबरला ठाण्यायातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
असे असेल वेळापत्रक
28 ऑगस्टच्या दुपारी 4 वाजेपर्यंत 1,49,948 अर्ज प्राप्त झाले असून, अनामत रकमेसह 1,16,583 अर्ज प्राप्त झाले आहेत. नवीन वेळापत्रकानुसार 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल. 13 सप्टेंबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करता येईल.
15 सप्टेंबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत आरटीजीएस / एनईएफटीद्वारे अर्जदारांना बँकेत अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. दि. 24 सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदविता येतील. पात्र अर्जदारांची अंतिम यादी दि. 7 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. 9 ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे लॉटरी काढली जाईल.
