तारदाळ – हातकणंगले रोडवर मंगळवारी सकाळी भरधाव मालवाहतूक टेम्पोने टाटा सुमोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात टाटा सुमोमधील प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले.
टाटा सुमो क्रमांक (एमएच ०९ / सीएम ३३६५) हे वाहन तारदाळ मधून हातकलंगलेच्या दिशेने जात असता बी.पी.एड कॉलेज समोर असणाऱ्या वळणावर समोरून मालवाहतूक टेम्पो क्रमांक (एमएच ५१/सी २००७९) तागे भरून भरधाव वेगाने येऊन सुमोला धडक दिली. यामध्ये प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रावण करण्यात आले. दरम्यान, सदर टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत वारंवार सुसाट वाहन चालवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. याप्रकरणी मद्यधुंद चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही स्थानिकांकडून होत आहे. यावेळी घटनास्थळी शहापूर पोलीस ठाणेचे पोलीस दाखल झाले. त्यांनी टेम्पो चालक गणेश कुमार राम याला ताब्यात घेतले आहे. सदर अपघातावेळी मालवाहतूक मध्ये असलेल्या कापड ताग्यासोबतच सदरचा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेऊनच कारवाई करावी अशी मागणी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी केली.
सदर रस्त्यावर बी.पी. एड कॉलेज समोर असणाऱ्या मार्गावर वारंवार अपघाताची मालिका सुरू आहे. यामध्ये अनेकांचा बळी गेलेला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन सदर रस्त्यावर दिशा फलक व गतीरोधक बसवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
