पत्नीचा खून करणारा सहा तासात जेरबंद

पेठवडगाव,भादोले (ता. हातकणंगले) येथे पत्नीचा खून करून पळून गेलेल्या संशयित आरोपीला पोलीसांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने ६ तासात जेरबंद केले. प्रशांत मारुती पाटील ऊर्फ गुंडा मिस्त्री असे संशयिताचे नाव आहे. संशयितांस पोलिसांनी कोर्टात हजर केले असता शुक्रवार (दि. ३) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

 संशयित प्रशांत याचा भादोले ग्रामपंचायत गाळ्यात दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्याचा आठ वर्षांपूर्वी ढवळी (ता. वाळवा) येथील रोहिणी हिच्याशी विवाह झाला. त्यांना एक तीन वर्षांची व एक सहा वर्षांची अशा दोन मुली आहेत. त्याचे सासरे आजारी असल्याने वारंवार रोहिणीस तिकडे जावे लागत होते. दुपारी दोघेही दुचाकीवरून ढवळीला गेले होते. सोमवार रात्री आठच्या सुमारास परत येत असताना वारणा नदीचा पूल ओलांडल्यानंतर गावाच्या बाजूस असणाऱ्या ओढ्याजवळ गाडी थांबवून प्रशांतने रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकली आणि कोयत्याने डोकीत सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने रोहिणी जागीच कोसळली. डोक्यात व मानेवर वर्मी वार झाल्याने रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला होता.