बावची फाट्यावर अपघातात चार मेंढ्यासह दुचाकीस्वार ठार

आष्टा – इस्लामपूर रस्त्यावर बावची फाटा (ता. वाळवा) येथे मद्यधुंद अवस्थेतील ट्रक चालकाने दोघा दुचाकी स्वारासह मेंढरांच्या कळपाला चिरडले. यामध्ये चार मेंढरासह मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. संजय आनंदा धनवडे (वय ५०, रा. दुधगाव ता. मिरज) असे अपघातातील मृताचे नाव आहे.

संदीप आदिनाथ पाटील (वय ३२ रा. दुधगाव) व नानासो ज्योतीराम अनुसे (रा. बावची) अशी जखमींची नावे आहेत. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी संदीप पाटील यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. उत्तम गणपती साळुंखे (रा. संजय नगर, सांगली) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बावची येथील नानासो ज्योती अनुसे व त्यांचे सहकारी हे मेंढराचा कळप घेऊन बावची येथून आष्टचाच्या दिशेने येत असताना इस्लामपूरहून आष्ट्याच्या दिशेने येत असणाऱ्या ट्रक (एमएच ४५ ०१२६) चालक उत्तम साळुंखे याने दारूच्या नशेत भरधावपणे ट्रक चालवत बावची फाटा येथे मेंढराच्या कळपात ट्रक घुसवला. यावेळी पाठीमागून येत असणाऱ्या दुधगाव येथील मोटारसायकलस्वार संदीप पाटील व संजय धनवडे यांनी याबाबतची माहिती ट्रकचालक यांना देत असताना त्या चालकाने त्या दोघांनाही जागीच चिरडले. यामध्ये धनवडे यांचा मृत्यू झाला तर मोटारसायकल चालक संदीप हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले. 

या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. याबाबतची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर धनवडे यांना आष्टा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी दुधगाव व परिसरातील नागरिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. सपोनि सत्यजित आवटे यांनी ग्रामीण रुग्णालय व घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. दरम्यान, अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. ट्रक चालक दारू प्यायलेल्या अवस्थेत दिसून आल्याने नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.