भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोची समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक बसल्याने गंभीर जमखी झालेल्या दोन परप्रांतीय ऊस तोडणी कामगारांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवार , ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६. १५ वाजण्याच्या सुमारास महुद – दिघंची रोडवरील चिकमहुद (ता. सांगोला ) येथील नीरा उजवा कालवा वळणावर घडला . चुलबुल अन्नू मुसाहिर (२४) आणि सुभाष फुलचंद मुसाहिर (२५ , सध्या दोघेही रा. दिघंची , ता. आटपाडी ,मूळ रा. संघरा ,ता. राणीगंज , जिल्हा प्रतापगड , उत्तर प्रदेश ) अशी मृत परप्रांतीय ऊस तोडणी कामगारांची नावे आहेत.
दिघंची येथील राजेंद्र रणदिवे यांच्याकडील परप्रांतीय ऊस तोडणी कामगार चुलबुल मुसाहिर व सुभाष मुसाहिर असे दोघेजण मिळून सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास एम . एच . ४५ /सी. ९०६५ या दुचाकीवरून महुद येथील दिघंचीकडे जात असताना वाटेत चिकमहुद येथील नीरा उजवा कालवा वळणावर दिघंचीकडून सिमला मिरची भरून अकलूज मार्केटला निघालेल्या एम . एच .१३/ ई . पी. १५५७ आयशर टेम्पोची सदर दुचाकीला जोराची धडक बसून हा अपघात घडला . अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव , पो.हे.कॉ . बिपीन ढेरे , पो. ना. दीपक लेंगरे , पो. कॉ . काशिनाथ कोळी , पोलीस पाटील प्रभाकर कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबासहेब भातुंगडे करीत आहेत.
