आष्टा अप्पर तहसीलचे काम चांगले – डॉ. खारगे

आष्टा तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी शेतकऱ्यांच्यात सहकार्य पूर्ण तडजोड घडवून आणत पाणंद रस्त्याचे अनेक वर्षे प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावले. भविष्यात हे पाणंद रस्ते आणखीन चांगले होतील. रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्यामुळे या रस्त्यांची सातबारावर नोंद होऊन, शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांची सोय झाली आहे. भविष्यात आष्टा तहसीलदार व त्यांचे सहकारी आणखीन चांगली कामे करतील, असे प्रतिपादन महसूल अप्पर मुख्य सचिव डॉ. विकास खारगे यांनी केले. आष्टा व कारंदवाडी (ता. वाळवा) येथे महसूल सप्ताह निमित्त महसूल अप्पर मुख्य सचिव डॉ. विकास खारगे, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी खुल्या केलेल्या पाणंद रस्त्यांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. 

आष्टा-वाळवा रस्त्यावरील बिरोबा मंदिर परिसरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या येडताक पांडू मळा ते बाबासाहेब मिस्त्री शेत जमीन पाणंद रस्ता आष्ट्याचे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या पुढाकाराने आणि मध्यस्थीने शेतकऱ्यांसाठी खुला केला आहे. तसेच कारंदवाडी येथील पेठ-सांगली महामार्ग लगत असणारा वाडकर मुलाणी आवटी हा पाणंद रस्ताही खुला करण्यात आला आहे. या रस्त्याची पाहणी केली. नागरिकांनी रस्ता खुला झाल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, अप्पर तहसिलदार राजशेखर लिंबारे, मंडळ अधिकारी संभाजी हांगे, तांबोळी ग्राम महसूल अधिकारी शिवाजी सकरे, दुष्यंत पाटील, अमित जंगम, विशाल उदगिरे, माजी संचालक रमेश हाके, पोलीस पाटील अमित जाधव, शितल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.