विटा पोलीस ठाण्यात संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न

 विटा (Vita) चोरी प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका संशयित आरोपींने विटा पोलीस ठाण्यातच वायरने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला.

 सोमवार रात्री उशीरा ही घटना उघडकीस आली असून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्रकाश शिवाजी चव्हाण (वय ४०) रा. सांडगेवाडी ता. पलूस याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.याबाबत अधिक माहितीअशी, पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथील रहिवासी असलेल्या प्रकाश शिवाजी चव्हाण (वय ४०) याला विटा पोलिसांनी एका चोरी प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. त्यानुसार सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास संशयित प्रकाश चव्हाण याला पोलीस ठाण्यातील एका खोलीत बसवून चौकशी सुरु होती. यावेळी पोलिसांची नजर चुकवून संशयित प्रकाश चव्हाण याने सदर खोलीतील उपकरणाची वायर गळ्याला गुंडाळून जोराने ओढून आत्महत्येचा प्रयत्न केला. 

या संपूर्ण प्रकारानंतर विटा पोलीस ठाणे अक्षरशः हादरून गेले. या प्रकारानंतर संशयित प्रकाश चव्हाण याला विटा पोलिसांनी तातडीने विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल केले आहे. तर पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयित प्रकाश चव्हाण याला ओमश्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान मंगळवार रात्री प्रकाश चव्हाण याच्या नातेवाईकांनी ओमश्री रुग्णालयासमोर मोठा गोंधळ घातल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.