पेठवडगावात भांडी व्यापाऱ्यावर चाकू हल्ला

पेठवडगाव,  “तुला आज सोडणार नाही’ असे म्हणत हद्दपार गुन्हेगाराने एका भांडी व्यापाऱ्यावर चाकू हल्ला करून रक्तबंबाळ केले. ही घटना कोल्हापूर रस्त्यावरील एका वाईन शॉप समोर मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याबाबत जखमी व्यापारी अमोल रामचंद्र काळे (वय ३९, रा. ओंकार पार्क शिवाजीनगर पेठ वडगाव) यांनी तिघा जणांविरुद्ध वडगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर रस्त्यावरील विजय वाई शॉप समोर हद्दपार आरोपी शुभम शिंदे याच्यासह यश माने, हर्षवर्धन पाटील (रा. वडगाव) हे तिघेजण स्प्लेंडर व अॅक्सीस मोपेड घेवून उभे होते. त्यावेळी तक्रारदार अमोल काळे समोर येताच आरोपी शुभम शिंदे याने ” तुला आज संपवणार ” असे म्हणत गळपट्टी धरली व त्यास मोटार सायकलवर जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केला. तक्रारदाराने त्याला विरोध करताच आरोपी शुभम शिंदे यांने चाकूने वार करून रक्तबंबाळ केले. याप्रकरणी हद्दपार आरोपी शुभम शिंदे यास वडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.