आष्टा अप्पर तहसीलच्या इमारतीचा प्रश्न निकाली काढू

प्रशासन पारदर्शक व गतिमान असेल तर त्याचा जनतेला फायदा होतो. आष्टा अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी कार्यालयातील कामे तात्काळ मार्गी लावली असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. इमारतीचा प्रस्ताव दिला असून याबाबत महसूल मंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच हा प्रश्न निकाली काढू, असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केले. आष्टा येथे महाराजस्व अभियानांतर्गत आष्टा अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित सेवा पंधरवडा कार्यक्रमात ते बोलत होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे, नायब तहसीलदार रजपूत, राजारामबापू दूध संघाचे चेअरमन संग्राम फडतरे, विशाल शिंदे, विजय यादव, विराज शिंदे, रघुनाथ जाधव, सरपंच हिम्मत पाटील हे प्रमुख उपस्थित होते. 

तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी प्रास्ताविकात अप्पर तहसीलदार कार्यालय अंतर्गत येणाऱ्या एकवीस गावांचा पाणंद रस्ते, घरकुले, जातींचे दाखले, धरणग्रस्त कामे प्रलंबित खटले, याबाबत आढावा दिला. शेतकऱ्यांच्या कामासाठी आम्ही येथे असून यापुढे अप्पर तहसील कार्यालय कायम कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली. वैभव शिंदे म्हणाले, आष्टा येथे पुरवठा विभाग सुरु करा अथवा तात्पुरते कॅम्प सुरू करा. महिन्यातून दोन वेळा सर्व विभागाची बैठक घ्या. योजना लोकांपर्यंत पोहचवा. शहरातील सर्व शासकीय कार्यालय एकाच इमारतीत यावीत या अनुषंगाने प्रशासकीय इमारत व्हावी. अप्पर तहसीलदार यांच्यासाठी शासकीय गाडीची सोय व्हावी. परिसरातील सुविधांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. यावेळी दिलीपराव वग्यानी, शिवाजी चोरमुले, बबन थोटे, रघुनाथ जाधव, सुनील माने, पांडुरंग ढोले, प्रभाकर जाधव, संभाजी हिंगे, राजकेदार आटूगडे, माणिक शेळके, अमित ढोले, सयाजी गावडे, अनिल सिद्ध, रिजवान नायकवडी आदी मान्यवर उपस्थित होते.