सध्याच्या राजकारणातील लुटारूंना पुरून उरणार बापमाणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस, बारामतीकर फक्त पेटवायचे काम करतात अशी राजकीय टोलेबाजी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली. सध्याची स्थिती पाहता आरक्षणाची नव्याने मांडणी आवश्यक असल्याचं ते म्हणाले. पंढरपूर येथे सुरू असलेल्या रयत क्रांती संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीच्या निमित्ताने ते आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्राच्या जनतेला लुटारूंचे राज्य नको असल्याने राज्यातील कष्टकरी जनता महायुतीच्या मागे उभी राहील आणि येत्या लोकसभेत 45 पेक्षा जास्त जागा निवडून देईल असं सदाभाऊ खोत म्हणाले. ते म्हणाले की, राज्यातील लुटारू राजकारण्यांना पुरून उरणार बापमाणूस देवेंद्र फडणवीस असून त्यांना टार्गेट करण्यासाठी कितीही वेळा त्यांच्या जातीवर बोललं जातं. तरी बहुजनांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम फडणवीस करत आहेत. बारामतीकर फक्त पेटवायचे काम करतात.
बुधवारपासून पंढरपूर येथे रयत क्रांती संघटनेच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात झाली. आज सकाळी सदाभाऊ खोत आपल्या सर्व कार्यकारणीसह शेतमाल हातात घेऊन नामदेव पायरी येथे आले होते. येथे संत नामदेवांच्या चरणी हा शेतमाल वाहिल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यंदा कार्तिकी यात्रेची महापूजा ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी करावी अशी पुष्टी जोडत आता महामंडळ वाटपात घटक पक्षांना स्थान मिळेल अशी अपेक्षा सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली. सध्या मराठा, धनगर आरक्षण प्रश्नवर राज्यात आंदोलने होत असताना आता खऱ्या अर्थाने सर्वच आरक्षणाची नव्याने मांडणी करावी लागेल असे वक्तव्य खोत यांनी केले. याबाबत राज्यातील विद्वानांनी बोलणे अपेक्षित असताना ते सर्व बिळात लपून बसल्याची टीका करताना याबाबत रयत क्रांती संघटना चार दिवसाचे आरक्षण शिबीर घेऊन यात विद्वानांना मार्गदर्शनासाठी बोलावले जाईल असे सांगितले.
या आधी आरक्षणाच्या प्रश्नी टीका
या आधी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तुमच्या काळात मराठा समाजाला आरक्षण का दिला नाही? तुमच्या काळात तुम्ही गोट्या खेळाय गेला होता का? की पत्ते खेळायला गेला होता का? अशी विचारणा माजी मंत्री सदाभाऊ खोतयांनी केली होती.