विट्यातील शिवाजीनगर, शाहूनगर आणि सुतारकी परिसरात रहिवासी क्षेत्रात अनेक पोल्ट्री आहेत. त्यामुळे दुर्गंधीचा आणि माशांचा मोठा त्रास तेथील ३०० ते ४०० कुटुंबांना सहन करावा लागत आहे.
याबाबत येथील माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल शितोळे यांनी विटा पालिका, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व संबंधितांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. याबाबत मुंबई उच्च न्यायालयासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही राहुल शितोळे यांनी दाद मागितली होती.
अखेर विट्याच्या शिवाजीनगरातील रहिवाशी भागातील पोल्ट्री ७२ तासांत बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयाने दिले आहेत. तसेच संबंधित पोल्ट्रींचा पाणी आणि वीज पुरवठा तत्काळ खंडित करा, असे निर्देशही विट्याच्या महावितरण आणि पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस.साळुंखे यांनी दिले आहेत.