रुकडी येथील ग्रामपंचायतीने गावातील लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीसाठी माहेरच्या साडी-चोळीचा आहेर देण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती सरपंच राजश्री रुकडीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.त्या म्हणाल्या, ‘या नावीन्यपूर्ण योजनेची सुरुवात ८ मार्च या जागतिक महिला दिनापासून होणार आहे.
यासाठी मुलीचे आई-वडील हे रुकडी गावचे रहिवासी असणे बंधनकारक आहे. मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे. मुलीचे लग्न आई-वडिलांच्या संमतीने होणे गरजेचे आहे. अशा रुकडीच्या रहिवासी असणाऱ्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
योजनेसाठी ग्रामपंचायतीने विशेष तरतूद केली असून, गावातील कुटुंबांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपसरपंच शीतल खोत, ग्राम पंचायत सदस्य श्वेता दाभाडे, वनिता गायकवाड, सुजाता कांबळे, मालती इंगळे, आदी उपस्थित होते.