हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये चुरशीने झालेल्या मतदानात ६८ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामुळे हातकलंगलेमधील तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार? याचे उत्तर चार जून रोजी मिळणार आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमध्ये विद्यमान शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला भाजपकडूनच कडाडून विरोध करण्यात आला होता. त्यामुळेएकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक खासदारांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा तिकिटे मिळवून देण्यासाठी ताकद लावली होती.
हातकणंगलेत अखेरच्या क्षणापर्यंत राजू शेट्टी विरुद्ध माने अशीच लढत होईल अशी चिन्हे होती. मात्र, राजू शेट्टी महाविकास आघाडीचे समर्थक उमेदवार असणार का? अशी सुद्धा चर्चा रंगली होती. मात्र, महाविकास आघाडीकडून त्यांना आघाडीमध्ये सहभागी होण्यास अट घालण्यात आल्याने राजू शेट्टी यांनी नकार दिला. त्यानंतर शेट्टी यांनी फक्त ठाकरे यांचा पाठिंबा घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला. मात्र त्यांना मशाल चिन्हाचा पर्याय देण्यात आला. त्यामुळे राजू शेट्टी यांनी एकला चलो ची भूमिका घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे ठाकरे गटाकडून अखेरच्या टप्प्यामध्ये सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे सरूडकर यांच्या उमेदवारीने मतदारसंघातील चित्र पूर्णतः पलटून गेले. गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघांमध्ये जातीचे समीकरण कमालीचे राहिले आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा हा घटक महत्त्वाचा ठरेल, अशीच चिन्हे आहेत. धैर्यशील माने यांच्या विरोधात असलेली नाराजी, राजू शेट्टींनी दिलेला लढा सत्यजित पाटील सरूडकर नवखा चेहरा आणि पश्चिमेकडे उमेदवारी गेल्याने हातकलंगलेमधील परिस्थिती पूर्णतः बदलून गेली आहे. त्यामुळे 4 जून रोजीच मतदारसंघाचा अंदाज येणार आहे.