आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने आयर्लंडचा धुव्वा उडवला आहे. या स्पर्धेतील आठव्या सामन्यात टीम इंडियाने 8 विकेट्सने विजय मिळवला. आयर्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 97 धावांचं आव्हान दिलं होतं.
टीम इंडियाने हे आव्हान 2 विकेट्स गमावून 12.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. रोहित शर्मा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. रोहितने सर्वाधिक 52 धावा केल्या. तर ऋषभ पंत आणि शिवम दुबे या जोडीने टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं.रोहित शर्मा आणि विराट कोहली ही सलामी जोडी मैदानात आली. विराटकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र विराट अवघी 1 धाव करुन माघारी परतला. त्यानंतर विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत मैदानात आला.
रोहित-ऋषभ या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची नाबाद भागीदारी केली. रोहितने या भागीदारी दरम्यान 36 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. मात्र त्यानंतर 1 बॉल खेळून रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट आऊट होत मैदानाबाहेर गेला. रोहितने 37 चेंडूत 4 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने 52 धावांची खेळी केली.रोहितनंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. मात्र सूर्याने निराशा केली. सूर्या 5 बॉलमध्ये 2 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर शिवम दुबे आला.
मात्र दुसऱ्या बाजूने ऋषभ पंतने फटकेबाजी करत टीम इंडियाचा विजय निश्चित केला. पंतने रिव्हर्स स्कूप शॉट मारत टीम इंडियाला विजयी केलं. पंतने 26 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 37 रन्स केल्या. तर दुबेला शून्यावर नाबाद परतावं लागलं. आयर्लंडकडून बेंजामिन व्हाईट आणि मार्क एडेअर या दोघांनी 1-1 विकेट घेतली.