सोलापूर रेल्वे स्थानकाला फाईव्ह स्टार लूक ….

सोलापूर रेल्वे विभागात अमृत योजनेतून ४६५ कोटींची कामे मंजूर आहेत. त्यात सोलापूर रेल्वे स्थानकावर भविष्यातील २० वर्षांतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, स्वच्छतागृह, पादचारी पूल, स्थानकाची सुरक्षा यावर भर देणाऱ्या ५६ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मूर्तरूप येत आहे.

मागील सात वर्षांपासून रेल्वेच्या विकासाला गती मिळाली आहे. प्रवाशांना मूलभूत सुविधा आणि सुरक्षा देण्याकरिता सोलापूरच्या रेल्वे स्थानकास अमृत योजनेचे बळ मिळत आहे. सर्वाधिक लोहमार्गांचे जाळे असलेल्या देशातील १०० वर्दळीच्या शहरांमध्ये सोलापूरचा समावेश आहे.दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून सोलापूरच्या रेल्वे स्थानकास महत्त्व आहे. अमृत योजनेंतर्गत सोलापूर रेल्वेस्थानक ५० वर्षानंतर कायापालट होत आहे. त्यासाठी ५६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.या मंजूर निधीतून रेल्वेस्थानकावरील स्वच्छतागृह, पादचारी पूल, सुरक्षा यावर प्रवाशांच्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेवर अधिक भर देण्यात आला आहे. मागील दहा वर्षांपासून केंद्राच्या विविध योजनेतून कामे सुरू आहेत.

देशातील इतर रेल्वेस्थानकांच्या तुलनेत सोलापूर रेल्वेस्थानकाने स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. वर्षभरातच अमृत योजनेच्या कामांना गती मिळाली आहे. आतापर्यंत ६० टक्के कामे पूर्ण झाले असून, ३९ कोटींच्या प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत.

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील १ हजार ३०९ रेल्वे स्थानकांचे अत्याधुनिक सुविधांसह नूतनीकरण करण्यात येत आहेत. तर ५६ स्थानके जागतिक दर्जाच्या टर्मिनसमध्ये रूपांतरित केली जात आहेत.सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेस्थानकावर सर्व सुविधा उपलब्ध होण्याबरोबर आरामदायी, सोईस्कर आणि आनंददायी रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळावा, हा या योजनेचा उद्देश आहे. यामध्ये सोलापूर विभागाचाही समावेश आहे. सोलापूरसह विभागातील नगर, दौंड, कोपरगाव, कुर्डुवाडी, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, बेलापूर, गाणगापूर, दुधनी, जेऊर, कलबुर्गी या स्थानकांचा कायापालट होणार आहे.