सांगोलाकरांनी अनुभवली डोळ्याचे पारणे फेडणारी रॅली

मुंबई येथून सांगोला येथे आगमन झाल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा सांगोला शहरात येताच, एकच जल्लोष साजरा करण्यात आला. सांगोला शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये भीम अनुयायी, महिला, बालचमू यांची मोठी उपस्थिती होती. रॅली दरम्यान माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी जेसीबीतून पुष्पवृष्टी करून रॅलीचे जंगी स्वागत केले. यासह रॅलीमध्ये सहभाग नोंदवत कार्यकर्त्यांसमवेत गाण्यावर ठेका धरला. यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करीत रॅलीचे स्वागत केले.

ज्ञानदीप विद्यालय यांच्याकडून रॅलीचे स्वागत केले. कडलास नाका येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने रॅलीचे जंगी स्वागत के ले. महात्मा फुले जयंती उत्सव मंडळाकडून रॅलीमध्ये सहभाग नोंदवत स्वागत केले. शिवप्रेमी मंडळ सांगोला यांच्या वतीने जेसीबीतून पुष्पृष्टी करत रॅलीचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. यासह विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय सामाजिक पक्षाचे पदाधिकारी यांच्याकडून रॅलीमध्ये सहभागी होत रॅलीचे स्वागत करण्यात आले.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, जय भीम जय भीम.. अशा घोषणा देत, भीम अनुयायी यांच्या वतीने सांगोला शहरातील ग्रामदैवत श्री अंबिकादेवी मंदिरापासून प्रमुख मार्गावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याची विविध फुलांनी सजवलेल्या मिरवणूक रथातून भव्य-दिव्य अशी फटाक्यांची आतिषबाजी करीत वाजत गाजत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जय भीम अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडले होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा आगमनामुळे सांगोला शहर सर्वत्र निळेमय झाले होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने जंगी नियोजन करण्यात आले होते. 

सदरची रॅली जय भवानी चौक ते तहसील कार्यालय रोड येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहोचल्यानंतर, पूज्य भंतेजी संबोधी यांच्या शुभहस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असणारा कलश सन्मानाने पूजन करण्यात आले. यावेळी आम. बाबासाहेब देशमुख, मा. आम. शहाजीबापू पाटील, सागर पाटील, रफिक नदाफ, मुंबई येथील कारागीर सचिन शिरगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने शहर व तालुक्यातील भीम अनुयायी, विविध समाजातील समाजबांधव उपस्थित होते.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरण कामासाठी एक रुपयाही निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास आम. डॉ. बाबासाहेब देशमुख व मा. आम. शहाजीबापू पाटील यांनी दिला. यावेळी आजी-माजी आमदार तसेच कारागीर सचिन शिरगावकर यांचा जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

रॅली दरम्यान सांगोला तालुक्यातील भीम अनुयायी, तरुण, महिला, युवती, बालचमू बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी अधिकारी कर्मचारी यांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता.