इस्लामपूर शहरामधील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणे रोखणार; पृथ्वीराज पाटील 

इस्लामपूर शहराला जिल्ह्यातील भौगोलिक महत्त्व मोठे आहे. त्यामुळे यापुढील काळात शहराचा नियोजनबद्ध विकास करणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिका हद्दीमध्ये बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणे होऊ देणार नाही. पालिकेची परवानगी घेऊन नागरिकांनी शहराच्या नियोजनबद्ध विकासाला साथ द्यावी, असे आवाहन नवे मुख्याधिकारी तथा प्रशासक पृथ्वीराज पाटील यांनी केले. पदोन्नतीनंतर इस्लामपूर पालिकेचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्या कार्यकाळात नियोजनबद्ध विकास आणि आरोग्याच्या विषयाला प्राधान्य देणार आहे.

सांगली जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर म्हणून इस्लामपूरची ओळख आहे. त्यामुळे शहराचा वाढता विस्तार आणि विकासाची गरज ओळखून बेकायदेशीरपणे होणारी बांधकामे आणि अतिक्रमणे रोखण्याला आपली प्राथमिकता असेल. त्यासाठी शहरातील क्रेडाई, अभियंता संघटना यांच्याशी समन्वय साधत मार्ग काढू. पाटील म्हणाले, नागरिकांनी बांधकाम करण्यापूर्वी पालिकेकडून रीतसर परवाना घेण्याची गरज आहे. प्रशासनाच्या पातळीवर परवाना देण्याची पद्धत अधिक सुटसुटीत करून सामान्य नागरिकांनाही न्याय देण्याचा प्रयत्न राहील.

इस्लामपूर शहरातील आरोग्य आणि स्वच्छतेबाबत नागरिकांनी स्वत:हून दक्ष असायला हवे. मानवी जीवनाशी निगडित असणाऱ्या या बाबींमध्ये नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्यावर त्याची तातडीने निर्गती करण्याची व्यवस्था करत आहे. शहरामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने पाण्याच्या पाइपलाइन लिकेज होऊन पाणीपुरवठ्यामध्ये विस्कळीतपणा येत आहे. तो सुरळीत राहण्यासाठी लक्ष देण्याच्या सूचना दिल्यात. गटार योजनेच्या कामासह उद्यान विकास, नाट्यगृहाचे नूतनीकरण कामांवरही लक्ष केंद्रित करणार आहोत.