अनेक वर्षांपासून राजेवाडी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात “पाणी आडवा, पाणी जिरवा” या संकल्पनेतून कामे झाल्याने राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरत नव्हता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यातही पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते हा गंभीर प्रश्न घेऊन या परिसरातील गोवर्धन गोडसे, यशवंत नरळे, प्रताप नरळे, सोमनाथ नरळे व उपसरपंच सोमनाथ पुजारी आदींसह अन्य शेतकरी शिष्टमंडळाने याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांची भेट घेतली.
याबाबत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लगेचच संबंधित विभागाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांना ताबडतोब उरमोडी उपसा सिंचन योजना आणि जीहे काठापूर उपसा सिंचन योजना यामधून राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्याचे आदेश दिले.
उरमोडी उपसा सिंचन योजना आणि जिहे काठापुर उपसा सिंचन योजना मधून राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. कपोले यांच्याकडे केली आहे. दरम्यान दिपकआबांच्या मागणीला यश आले असून दोनच दिवसांत उरमोडीचे पाणी राजेवाडी तलावात दाखल होणार आहे.
विशेष म्हणजे दरवर्षी नियमितपणे उरमोडी आणि जिहे काठापुर योजनेतून राजेवाडी तलाव भरून देण्याचे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांनी मान्य केले आहे. उरमोडी आणि जिहे काठापूर उपसा सिंचन योजनेतून राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर, कटफळ, शेरेवाडी, बंडगरवाडी, चिकमहुद, दुधाळवाडी अचकदानी नरळेवाडी आणि वाकी या परिसरातील हजारो एकर क्षेत्राला राजेवाडी तलावातील पाण्याचा फायदा होतो.अवघ्या दोन दिवसात उरमोडीचे पाणी राजेवाडी तलावात दाखल होणार असल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यातून आनंदाचे वातावरण पसरले आहे.