वैभव पाटील हे सध्या राष्ट्रावादीच्या अजित दादा गटात आहेत. हा पक्ष महायुतीतील एक घटकपक्ष आहे .खानापूर मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेलाच जाणार असल्याने वैभव पाटील कोणत्या पक्षात उभा राहणार ? याकडेच मतदारसंघाच्या सर्वांच्या नजरा आहेत. कोणत्याही परिस्थितीत मैदान मारणारच असा विश्वास बांधून ते तयारी करत आहेत. ते पक्ष बदलून शरदचंद्र पवार गटाच्या तुतारीकडे लवकर वळणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे आमदार पडळकर यांचे ज्येष्ठ बंधू माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील कोणत्याही परिस्थितीत यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्याची भूमिका घेत मतदार संघात जनसंपर्क वाढविला आहे.
दरम्यान आज वैभव पाटील यांनी बेरजेचे राजकारण करत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा राजकीय डाव टाकत आमदार पडळकर यांना वाढदिवसानिमित्त झरे येथील गेस्ट हाऊस वर शुभेच्छा दिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघामधील भेटील विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे .आगामी विधानसभा निवडणुकीत आटपाडी तालुक्यातुन कोण कोणाला साथ देणार ?यावर निवडणुकीचे गणिते ठरलेली असतात. त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर आणि वैभव पाटील यांच्यातील मंगळवारच्या भेटीने मात्र मतदारसंघात चांगलीच खळबळ होणार आहे.