पट्टणकोडोली पंचकल्याणक महामहोत्सवाची मोक्षकल्याणक सोहळ्याने सांगता…..

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील श्री १००८ भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, सकल दिगंबर जैन समाज, पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव समिती, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री १००८ भगवान आदिनाथ तीर्थंकर व शिखरस्थ पार्श्वनाथ भगवान मानस्तंभोपरी चतुर्मुख तीर्थंकर आदिनाथ द्वादश वर्षानिमित्त पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवामध्ये प.पू. आचार्य रत्न श्री १०८ जिनसेनजी महाराज, प. पू. ज्ञानयोगी आचार्य श्री १०८ विद्यानंदीजी महाराज, प. पू. गणिनी प्रमुख आर्यिकारत्न १०५ जिनदेवी माताजी यांच्या दिव्य सानिध्यात मोक्षकल्याणक सोहळा सोमवारी पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचा सांगता समारोह मंगलमय वातावरणात पार पडला. 

पहाटे मंगलवाद्य घोष, सकाळी ७ वाजता नित्यविधी, मंगलकुंभ आणणे, पंचामृत अभिषेक शांतीधारा, हवन, नवप्रभातच्या नलिन किरणावर भगवान आदिनाथांचे मोक्षगमन, अग्रिकुमार देवाचे आगमन, मोक्षकल्याणक पूजन व विश्वशांती महायज्ञ आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.  शुभ कुंभ लग्रावर प्रतिष्टीत मुर्ती स्थापन करणे, सकाळी ११ वाजता १००८ कलशाचे द्वादश वर्षपूर्तीनिमित्त महामस्तकाभिषेक करण्यात आला. दुपारी १ वाजता – ध्वज अवरोहण, कंकणविमोचन, सत्कार समारंभ व अन्य कार्यक्रमांनी गेल्या सहा दिवसापासून सुरु असलेल्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाची उत्साहाने सांगता करण्यात आली.