इस्लामपुरात 22 जानेवारीला अयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण!

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सांगली जिल्ह्यातील 725 गावांमध्ये होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत भोसले पाटील यांनी दिली.पाटील म्हणाले हा कार्यक्रम कोणत्या पक्षाचा, धर्माचा व जातीचा नसून श्रद्धेचा आहे. त्यामुळे या उपक्रमामध्ये सर्व समाज घटकांचा सहभाग असावा अशी अपेक्षा आहे.

22 जानेवारीला प्रत्येक गावातील ग्रामदैवताच्या मंदिरात सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत हे प्रक्षेपण होईल. त्यानंतर त्या त्या गावातील सर्व समाज आणि भावकीतील प्रमुख व त्यांच्या पत्नी आणि बाबरी मशीद पतन करण्यामध्ये जे कारसेवक सहभागी होते अशा सर्वांच्या हस्ते महाआरती होईल.

त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. पाटील म्हणाले इस्लामपूर शहरात एक ते 15 जानेवारी दरम्यान श्री राम मूर्तीची शोभायात्रा व अयोध्येहून आलेल्या अक्षतांचे घरोघरी वाटप होईल. 14 ते 20 जानेवारीला वाकोबा मंदिर परिसरात गीत रामायणाचा कार्यक्रम होईल.

22 जानेवारीला यल्लमा चौकात आयोध्येतील कार्यक्रमाचे प्रक्षेपण होईल. शहरातील 41 समाजातील प्रमुखांच्या हस्ते श्रीराम मूर्तींचे औक्षण व महाआरती होईल. जिल्हा आणि शहरातील सर्व समाजातील नागरिकांना या श्रद्धेच्या उपक्रमात सहभागी सहभाग घ्यावा.